Rajasthan Crisis : सचिन पायलट यांनी माफी मागितलं तर काही तरी होऊ शकतं, काँग्रेसच्या महासचिवांनी सांगितलं

नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी बुधवारी म्हटले की, जर राज्याचे माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या चुकांसाठी माफी मागितली तर काही तरी होऊ शकते, परंतु प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा असते. उप मुख्यमंत्री पद आणि राजस्थान प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर पायलट यांनी स्पष्ट केले की ते भाजपामध्ये जाणार नाहीत.

पायलट यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता पांडे यांनी म्हटले की, देवाने त्यांना समृद्धी द्यावी. ज्या पक्षांने त्यांना मोठे केले, तो पक्ष त्यांच्याकडून एक जबाबदार नेता असण्याची अपेक्षा करतो. माझा त्यांना हा निरोप आहे. पांडे यांनी या आरोपाचा पुनरूच्चार केला की, अशोक गेहलोत सरकार पाडण्याच्या कटात पायलटसुद्धा सहभागी होते.

अजूनही पायलट यांच्यासाठी काँग्रेसमध्ये काही शक्यता आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, शक्यता का नाही असणार? पाच दिवसांपासून शक्यताच शक्यता होती. अजूनही पायलट यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत का, या प्रश्नावर काँग्रेस महासचिवांनी म्हटले, दरवाजे नेहमीच खुले असतात, खुले आहेत.

जर पायलट यांनी सरकार पाडण्याच्या कटासाठी आपली चूक मागितली तर काही तरी होऊ शकते का, या प्रश्नावर ते म्हणाले, निश्चित काहीतरी होऊ शकते, परंतु प्रत्येक गोष्टीची कालमर्यादा असते. ज्या चुका त्यांनी केल्या आहेत, त्यासाठी जर त्यांनी माफी मागितली तर सर्वकाही होऊ शकते.