चोरीसाठीच घेतले 90 लाखांचे घर, 20 फूट खोदकाम केलं अन् 400 किलो चांदी केली लंपास; वाचा संपूर्ण प्रकार

जयपूर : वृत्तसंस्था – चोरटे चोरी करण्यासाठी काय पद्धत वापरतील याचा काही नेम नसतो. असाच प्रकार राजस्थानची राजधानी जयपूरच्या वैशाली नगर परिसरात घडला. या चोरट्यांनी चोरी करण्यासाठीच तब्बल 90 लाखांचे घर घेतले, 20 फूट खोल सुरुंग बनवले. अन् तब्बल 400 किलो चांदी लंपास केली. ही चोरी शहरातील प्रसिद्ध हेअरप्लांट विशेषज्ञ डॉक्टर सुनीत सोनी यांच्या घरात झाली. चोरट्यांनी तळमजल्यात तीन बॉक्समध्ये लपवलेल्या कोट्यवधींची चांदी चोरून नेली.

जयपूरमध्ये झालेल्या या प्रकारानंतर चोर किती युक्त्या लढवत आहेत हे दिसत आहे. चोरट्यांनी चोरीसाठी 90 लाख रुपयांचे घर डॉ. सोनी यांच्या घरामागे घेतले होते. त्यानंतर चोरट्यांनी या घरातील खोलीमध्ये खोदाई सुरु केली. तसेच त्यांनी डॉ. सोनी यांच्या घरामध्ये पोहोचण्यासाठी सुरुंग बनवला होता. या चोरट्यांनी सोनी यांच्या घरातील कोट्यवधींची चांदी चोरून नेली. जेव्हा डॉ. सोनी तळमजल्याजवळ गेले तेव्हा त्यांना चांदीचे बॉक्स गायब झाल्याचे दिसले. त्यानंतर डॉ. सोनी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सुरुंगाच्या माध्यमातून घरात प्रवेश
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा त्यांना समजले, की चोरट्यांनी डॉ. सोनी यांच्या मागील घरातील खोलीत खोदाई केली. त्यानंतर चोरट्यांनी सुरुंग बनवले. मात्र, याची माहिती चोरांना समजली होती. त्यामुळेच चोरट्यांनी बेसमेंटपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन बनवला. त्यासाठी त्यांना सुरुंगाची गरज होती. त्यामुळे त्यांनी डॉ. सोनी यांच्या घराजवळ घर खरेदी केले आणि त्यानंतर सुरुंग बनवण्याची तयारी केली. सुरुंगाच्या माध्यमातून चोरटे बेसमेंटपर्यंत पोहोचले आणि त्यांनी चांदी चोरून नेली.

तीन बॉक्स जमिनीत पुरले
या डॉक्टर दाम्पत्याने तीन महिन्यांपूर्वी बेसमेंटमध्ये जमिनीच्या खाली तीन बॉक्समध्ये चांदी भरली होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी घरातील बेसमेंटमध्ये वरून फरशी टाकून ते पक्के काम केले. पण चोरट्यांना याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी हे कृत्य केले.