मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा ; ‘या’ 3 बड्या राष्ट्रांची मागणी

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने मांडलेला आहे. मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीबाबत चीनने याआधी नकाराधिकाराचा वापर केलेला होता.

मसूदला दहशतवादी म्हणून घोषित करण्याबरोबरच त्याच्यावर प्रवासबंदी, शस्त्रबंदी आणि संपत्ती जप्तीची कारवाई करण्याची मागणीही या देशांनी केली आहे. तर, संयुक्त राष्ट्रानेही भारत-पाकिस्तानमधील तणावानंतर तातडीची बैठक बोलावली आहे.

मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे. पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या शक्तिमान सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ग्रहण केल्यानंतर हा प्रस्ताव फ्रान्स निर्बंध समितीत मांडू शकेल. ही परिषद १५ सदस्यांची असून, दर महिन्याला तिचे अध्यक्षपद एकेका देशाकडे जाते. हे अध्यक्षपद एक्वाटोरियल ग्युनियाकडून एक मार्च रोजी फ्रान्सकडे जाईल. सुरक्षा परिषदेचा फ्रान्स हा स्थायी सदस्य असून, त्याला नकाराधिकार (व्हेटो) आहे. मसूद अझहर याच्यावर बंदी घातली जावी, अशा प्रस्तावावर फ्रान्स काम करीत असून, तो खूप लवकर तयार होईल, असे सूत्रांनी सांगितले. तसेच मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करण्यात आली असून तसा प्रस्तावही संयुक्त राष्ट्रात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता, या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र काय भूमिका घेणार याकडे जगातील बहुतांश देशांचे लक्ष्य लागले आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला होता. सुरक्षा परिषदेने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत अशा निंदनीय हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा सुरक्षा परिषदेने व्यक्त केली आहे. सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावात दहशतवादी मसूद अजहर याच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. हे पहाता चीनचा समावेश असलेल्या सुरक्षा परिषदेतील या ठरावाचे महत्व वाढले आहे. पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्यांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सहकार्य करावे असे आवाहनही सुरक्षा परिषदेने या प्रस्तावाच्या माध्यमातून केले आहे.

कोण आहे मसूद अजहर ? –

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर दहशतवादी हल्लाकरण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मसूद अजहर हा याच दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. भारताविरुद्ध कारवाया करणे आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत मसूद अजहरचं नाव पहिलं आहे.मसूद अजहरचे शिक्षण कराची येथील जमिया उलूम अल इस्लामिया येथे झाले. त्यानंतर तो हरकत-उल अंसार या संघटनेत सामील झाला. त्याला पहिल्यांदा १९९४ मध्ये त्याला दहशतवादी कारवाया प्रकरणी श्रीनगरमध्ये अटक केली होती.

जैश-ए-मोहम्मदची स्थापना – नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्ली येथे जात असलेल्या विमानाचे दहशतवाद्यांनी २४ डिसेंबर, १९९९ रोजी अपहरण केले होते. त्यात १८० प्रवाशी होते. या प्रवाशांच्या मुक्ततेसाठी अटल बिहारी वाजपेयी सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मसूद अजहरसह तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. सुटकेनंतर  त्याने पाकिस्तानमधील कराचीत  ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेची स्थापना १९९९ मध्ये केली होती.

संसदेवर हल्ला – जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेच्या स्थापनेच्या वर्षभरातच २००१ मध्ये  संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना १३ डिसेंबरला लष्कर- ए- तैय्यबा आणि जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ दहशतवाद्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जखमी झाले. भारतीय संसदेवरील हल्ल्यानंतर अजहरला पाकिस्तानमध्ये अटक केली होती. पण कुठलाही पुरावा नसल्याच्या कारणावरून लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००२ मध्ये त्याची सुटका करण्यात आली.

मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील –

मसूद अजहर हा पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. तो पाकिस्तानमध्ये राहून दहशतवादी कारवाया करत आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. चीनकडून मात्र याला विरोध होत आहे.त्याच्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) अंतर्गत प्रतिबंध घालण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने याआधीच दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा बंदी असलेल्या संघटनांच्या यादीमध्ये समावेश केला आहे. मात्र, या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर अद्याप बंदी घातलेली नाही.