गुप्तचर यंत्रणेला अलर्ट ! जम्मू-काश्मीरमध्ये 11 मे रोजी होऊ शकतो मोठा आतंकवादी हल्ला

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचा कहर सुरु असताना जम्मू-काश्मीरमध्ये  दहशतवाद्यांच्या कुरघोड्यांनाही भारतीय सैन्य दल चोख प्रत्युत्तर देत आहे. मागच्या काही दिवसांपासून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.  राजौरी, कुपवाडा , पूंछ इथे कुरघोडी करणार्‍या दहशतवाद्यांना जवानांनी चोख प्रत्यतर दिले आहे. या कुरापती सुरु असतानाच  काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ले घडवून आणले जाणार आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने 11 मे रोजी एकाच वेळी हे हल्ले घडवून आणण्याची योजना आखल्याची माहिती मिळाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ले घडवून आणण्याची योजना आखली जात आहे. यामध्ये भारतीय सैन्य आणि निमलष्करी तळाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी दहशतवादीविरोधी मोहिमेशी संबंधित असलेल्या एका अधिकार्‍याने ही माहिती दिली.

भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रावळपिंडी इथे मुफ्ती अब्दुल रउफ असगरची खडख अधिकार्‍यांसोबत बैठक होणार होती. 11 मे रोजी काश्मीरमध्ये आत्मघातकी हल्ला घडवून आणण्याच्या योजनेमध्ये मुफ्ती अब्दुल रउफ असगरचाही हात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिऴाली आहे.