मुंबईवर पुन्हा होऊ शकतो दहशतवादी हल्ला, ‘गुप्तचर’ यंत्रणांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – २६/११ च्या महाभयंकर हल्लानंतर आता पुन्हा एकदा देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा अंदाज गुप्तचर संस्थांनी व्यक्त केला आहे. पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा पथकांवरील हल्ले वाढवण्याबरोबरच आता मुंबईलाही लक्ष्य करु शकते अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिली आहे.

ते वक्तव्य गांभीर्याने घ्यावे- गुप्तचर यंत्रणा
पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी संसदेच्या संयुक्त सत्रात भारताविरोधात गरळ ओकत ‘जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवल्यामुळे भारतात आता पुलवामा सारख्या घटना होतील’ असा धमकीवजा इशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सरकारला सावध केले आहे. या यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान अतिरेकी गटांना प्रोत्साहन देऊ शकतो. यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना मुंबईला टार्गेट करू शकते.

अशी असू शकते हल्ल्याची योजना
जैशच्या तीन जणांच्या टीमवर मुंबई हल्ल्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकणार असून यासाठी पाकिस्तान आपल्या स्लीपर सेलला सक्रीय करेल असा गुप्तचर यंत्रणांचाचा अंदाज आहे. यंत्रणांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर केंद्राने राज्य पोलिसांना महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले जात आहे.