मसूदचा भाऊ म्हणतो… भारताच्या हवाई हल्ल्यात जैशचे मोठे नुकसान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीर मध्ये बालाकोट येथे मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता हवाई हल्ला केला. यात जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेचे ३५० दहशतवादी ठार झाले. परंतु पाकिस्तानने मात्र या जीवित हानीचा इन्कार केला आहे. अशा पार्श्वभूमीवर जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने भारताच्या हवाई हल्ल्यात जैशचे मोठे नुकसान झाले आहे असे म्हणले आहे.

एका श्राव्य फिती (ऑडिओ क्लिप) द्वारे त्याने भारताच्या हवाई हल्ल्या संदर्भात हे मत अम्मारने व्यक्त केले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अम्मारने ‘मर्काज’ वर बॉम्ब पडले असल्याचे म्हणले आहे. भारतीय लढाऊ विमाने जैशचे तळ उद्ध्वस्त केल्याचे अम्मार या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहे. तसेच भारत या शत्रू राष्ट्राने युद्ध पुकारले आहे असे देखील अम्मार या क्लिपमध्ये म्हणाला आहे. भारताने हवाई हल्ला केल्याच्या दुसऱ्या दिवशी पेशावर येथील जाहीर सभेत त्याने हे भाषण केले असे मानले जाते आहे.

भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही एजन्सीच्या मुख्यालयावर बॉम्ब टाकले नाहीत. तर कश्मीरी मुस्लिमांची मदत करण्यासाठी भारताने आमच्यावर हमला चढवला आहे असेही अम्मारने या क्लिप मध्ये म्हणले आहे.