Jalana News : शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या ! कारसह मृतदेह जाळल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारी (दि 8) सकाळी जालना तालुक्यातील सेवली-नागपूर या आडमार्गी रस्त्याच्या दरीत एका जळालेल्या कारमध्ये पुरुषाचा सापळा आढळून आला आहे. घटनास्थळी सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रांवरून हा जळालेला मृतदेह शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश शेळके (रा. पाहेगाव, ता. जि. जालना) यांचा आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे की, खून करून मृतदेह कारमध्ये ठेवून तो कारसह जाळण्यात आला असावा.

सोमवारी सकळी ही कार आढळून आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर पोलिसांना एका पुरुषांचा हाडांचा सापळा दिसला. यानंतर पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना एक पाकिट सापडलं. कागदपत्रांवरून हा मृतदेह शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश शेळके (रा. पाहेगाव, ता. जा. जालना) यांचा असल्याचं स्पष्ट झालं असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना घटनास्थळी काही दगडांवर आणि रूमालावर रक्ताचे डागही दिसले.

परतूरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सेवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे, मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन गुड्डेवार यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी, फिगर प्रिंट पथक, डॉग स्कॉड यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा चालकाच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेत आहे. जळालेल्या सांगाड्याचं डोकं वर आहे. चालकाच्या बाजूच्या सीटच्या दिशेला सांगाड्याचे पाय असल्याचं चित्र होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरीत उतरताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेवली पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही कार दरीत असल्यानं घटनास्थळी जाताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे घसरून पडल्यानं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.