आईने काढली दृष्ट… मुलाने केला कडक सॅल्युट !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कर्तव्य बजावून घरी परतलेल्या जालनातील राज्य राखीव पोलीस दलाच्या एका फौजदाराचे घरी अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. पत्नी व नातेवाईकांनी या फौजदारावर पुष्पवृष्टीने केलीच, मात्रा, वृद्ध आईने पारंपरिक पद्धतीने दृष्ट काढत स्वागत केले. कोरोना योद्धा फौजदाराने देखील कडक सॅल्युट मारून या सत्काराची परतफेड केली. दत्तात्रय खांडेकर असे फौजदाराचे नाव असून ते राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

कोरोनाने थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पण अशा बिकट परिस्थितीत देखील पोलीस बांधव स्वतःचे कुटुंबाची पर्वा न करता रात्रदिवस ड्युटी करीत आहेत. खांडेकर कंपनीसोबत नाशिक जिल्ह्यातील मालेगावात कोरोना बंदोबस्तावर गेले होते. मालेगावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढला की, तेथे बंदोबस्तावर असलेल्या खांडेकर यांच्या अनेक सहकारी पोलीस जवानांना कोरोनाने ग्रासले.

परंतु, खांडेकरांनी न डगमगता मालेगावमध्ये कर्तव्य काळ पूर्ण केला. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून खांडेकर यांच्यासह इतर 67 जवानांना भोकरदन येथे क्वारंटाइन करण्यात आले. क्वारंटाइन काळ पूर्ण केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे क्वारंटाइन सेंटरमधून त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.