‘जलयुक्त शिवार’ योजना अत्यंत चांगली अन् लोकहिताची, पंकजा मुंडेंकडून फडणवीसांची पाठराखण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या योजनेतील गैरकारभाराबाबत कॅगनं ताषेरे ओढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारनं देवेंद्र फडणवीसांना दिलेला एक मोठा धक्का मानला जात आहे. यावरून आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जलयुक्त शिवार योजनेची पाठराखण केली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत चांगली आणि लोकहिताची आहे. त्यांनी चौकशी लावावी किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे. जलयुक्त शिवाराची कामं ही लोकांनी केलेली योजना आहे. बीड जिल्ह्यात लोकांना फायदा झाला आहे” असं त्या म्हणाल्या.

तसंच पंकजा मुंडेंनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रप्रपंचावर भाष्य करणं टाळलं आहे. राज्यपालांवर मी टिप्पणी करणार नाही असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दोघांनीही एकमेकांना उत्तर देऊन झालं आहे. मी आता यावर काय भाष्य करणार असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

जोरदार पावसानं झालेल्या नुकसानीनंतर त्यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: बांधावर जावं, मी जेव्हा बोलते तेव्हा संपूर्ण सरकार विषयी बोलते. जलगतीनं निर्णय घ्यावा. किमान काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे असंही पंकजा यांनी सांगितलं.