जळगाव : 2 मुलांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या

जळगाव : आईने आपल्या दोन लेकारांसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगावमधील कनाशी शिवारातील विहिरीत हा प्रकार घडला.

गायत्री दिनेश पाटील (वय ४३), तिचा मुलगा खुशवंत (वय १०) आणि मुलगी भैरवी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. गायत्री पाटील ही दोन्ही मुलांसह बुुधवारी कनाशी शिवारात असलेल्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळ झाली तरी ती व मुले घरी परत न आल्याने तिची शोधाशोध सुरु झाली. काही जण शेतात पोहचले असता तेथील विहिरीमध्ये त्यांना तीन मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यांना जवळच्या भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले.

गायत्रीचे आईवडिल व नातलग रात्री उशिरा भडगाव येथे पोहचले. आपली मुलगी व नातुंचे मृतदेह पाहून त्यांनी एकच टाहो फोडला. गायत्री हिने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा संशय असून त्यामागील कारण अद्याप समोर आले नाही. भडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.