३ लाखाच्या लाच प्रकरणी सहाय्यक निरीक्षकासह चौघे पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगावच्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने सन २०१७ साली लाच प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची १० दिवसाची पोलिस कोठडी न घेण्यासाठी तसेच कथीत मालमत्‍तेची चौकशी न करण्याच्या मोबदल्यात 3 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी एका सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (एपीआय) चौघा पोलिसांविरूध्द चाळीसगाव पोलिस ठाण्यात आज (दि. १४ एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्यामध्ये जळगाव अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमधील दोन पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. एपीआयसह चौघा पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक भिमा नरके (सध्या नेमणुक – नागपूर शहर. रा. नागपूर), जळगावच्या विशेष शाखेतील पोलिस कर्मचारी विजय जाधव, जळगाव अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोमधील पोलिस कर्मचारी शामकांत पाटील आणि अरूण पाटील यांच्याविरूध्द चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने जळगावच्या अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक भिमा नरके हे पोलिस कर्मचारी शामकांत पाटील आणि अरूण पाटील यांच्या करवी तक्रारदाराकडे 3 लाख रूपयाची लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर चाळीसगाव पोलिस ठाण्यात एपीआय नरके, पोलिस कर्मचारी विजय जाधव, शामकांत पाटील आणि अरूण पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराविरूध्द जळगाव अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने सन २०१७ मध्ये कारवाई केली होती. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक नरके जळगाव येथे नियुक्‍तीस होते. तेव्हापासुनचे हे प्रकरण असल्याचे समोर आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपाधिक्षक जी.एम. ठाकुर करीत आहेत.