2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा 12 वीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन वेगवेगळ्या अपघातांत बारावीच्या दोन मुलांचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने ने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून या घटना अलिबाग आणि जळगावमधील आहेत. काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.

अलिबागमध्ये झालेल्या अपघातात एका मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आणि दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अलिबागकडून वडखळच्या दिशेने जात असताना, समोरील बाजूने येत असलेल्या ट्रकने ओव्हरटेक करताना, बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांना चिरडले. त्यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. योगेश उमरीया हे मरण पावलेल्या मुलाचे नाव असून शादाब छापेकर आणि आकाश थळे ही मुले जखमी झाली आहेत.

जळगावमध्ये बारावीची परीक्षा देऊन घरी परतत असताना दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. कुसुंबा गावाजवळील हॉटेल नीलांबरी जवळ हा अपघात झाला असून यात अदनान खान या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि एक मुलगा गंभीर जखमी आहे. हे विद्यार्थी जळगावमधील मिल्लत ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी होते. शेख मोहंमद शेख अब्दुल रहमान कुरेशी असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्यांचा हिंदी या विषयाचा पेपर होता.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरसोबत धडक झाली, यात दुचाकी चालविणारा अदनान खान हा जागीच ठार झाला. तर शेख मोहंमद हा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामध्ये ट्रॅक्क्टर चालक सुद्धा जखमी झाला आहे. या घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये मृताच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.