जळगाव महापालिका : सत्ता राखण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजनांनी घातली अट, म्हणाले – ’10 नगरसेवक आणा अन् महापौर व्हा’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण सत्ताधारी भाजपचे 57 पैकी तब्बल 27 नगरसेवक फुटल्याने अल्पमतात आलेल्या भाजपकडे केवळ 30 नगरसेवक आहेत. त्यामुळे येथे सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे भाजपचे संकटमोचक माजी मंत्री गिरीश महाजन यांची मोठी अडचण झाली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी 8 नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून 10 नगरसेवक आणणाऱ्या उमेदवाराचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले जाणार असल्याचे समजते. येत्या गुरुवारी होणारी ही निवडणूक ऑनलाईन पध्दतीनेच होणार आहे.

गुरुवारी होणा-या या निवडणुकीसाठी जो कोणी उमेदवार सोमवारी10 नगरसेवक आपल्या बाजूने आणेल, त्याचे नाव महापौर व उपमहापौरपदासाठी अंतिम केले जाईल, अशी अट महाजन यांनी घालून दिली आहे. बुधवारी सकाळी शिवसेनेकडून जयश्री महाजन व कुुलभूषण पाटील यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी भाजपकडून महापौरपदासाठी भारती सोनवणे व प्रतिभा कापसे यांचे, तर उपमहापौरपदासाठी मयुर कापसे व सुरेश सोनवणे यांनी अर्ज केले. महाजन यांनी ही चार नावे दिली. सोमवारी भाजपच्या 9 नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला होता. दरम्यान भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण गायब झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. भाजप नगरसेविका ॲड. सुचिता हाडा यांच्यासोबत नाशिकला जात असल्याचे ज्योती चव्हाण यांनी सांगितले होते. मात्र नाशिकला गेल्यानंतर त्यांचा संपर्क झाला नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पत्नीचा शोध घेऊनही ती न मिळाल्याने चव्हाण यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दिली आहे.