जळगाव : बेपत्ता तरुणीचा मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बेपत्ता अल्पवयीन तरुणाचा मृतदेह जळगाव शहरातील मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आज सकाळी ओढणीने हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. रामेश्वर कॉलनीतील विशाल भोई या तरुणाने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर खून केल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत तरुणी ही मच्छीबाजार परिसरात वास्तव्यास आहे. ती आदर्शनगर मधील रोहीत नाथाणी यांच्या घरी धुणीभांडी करण्याचे काम करत होती. रविवारी सकाळी 11 वाजता नाथाणी यांच्या घरातील काम करण्यासाठी गेली होती. यानंतर दुपारी साडे बाराच्या सुमारास विशाल भोई हा तेथे आला. सुरुवातीला नाथाणी यांच्या घरच्यांकडे तरुणीबाबत चौकशी करून निघून गेला. काही वेळाने विशाल पुन्हा आल्यानंतर तरुणी बाहेर येऊन त्याला भेटली.

यानंतर दोघेजण निघून गेले. दुपारी दोन वाजता तरुणीची आई तिला घेण्यासाठी नाथाणी यांच्या घरी आली. तत्पूर्वी तरुणी एका मुलासोबत साडेबाराच्या सुमारास निघून गेल्याचे नाथाणी यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. सायंकाळी तरुणीच्या वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध अपहरणचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.

आज सकाळी सातच्या सुमारास या तरुणीचा मृतदेह मेहरुण तलावात आढळून आला. तिच्या डाव्या हाताला ओढणी गुंडाळलेली होती. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठवून दिला. पोलिसांनी मयत मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.