Jalgaon News : भर दिवसा रिव्हॉल्वरच्या धाकाने 15 लाखांची लूट

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकीवरून १५ लाख रूपयांची कॅश घेऊन जाणाऱ्या दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोकड घेऊन फरार झाल्याची घटना जळगाव या ठिकाणी घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके
महेश चंद्रमोहन भावसार आणि संजय सुधाकर विभांडीक हे दोघजण दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास १५ लाख रूपयांची रोकड घेऊन सिव्हील हॉस्पीटलच्या दिशेने जात होते. यामध्ये महेश भावसार हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यांच्याकडे ती रोकड असलेली बॅग होती तर संजय सुधाकर विभांडीक हे त्यांच्यासोबत दुसऱ्या दुचाकीवरून जात होते. हे दोघेजण जेव्हा पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले तेव्हा त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यामधील एकाने महेश भावसार यांच्याकडील बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला यश आले नाही. यामुळे त्या चोरट्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हर काढून त्यांना धमकावले. यामध्ये त्यांच्यात झटापट झाली. या झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. त्यानंतर ते दोघेही चोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खाली पडलेले मॅगेझीन जप्त करून पुढील तपासास सुरुवात केली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. दोन्ही चोरट्यांनी एकाच दिशेने पळत गेले असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.