जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – Jalgaon Crime News | पाय घसरुन नदीमध्ये पडल्यामुळे बुडणाऱ्या पाच वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलासह त्याची आई आणि मावशी यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना जळगाव येथील अंजाळे गावाजवळील घाणेकर नगरालगत असलेल्या तापी नदीपात्रात घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, घाणेकरनगर येथे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी भिल कुटुंबाकडे त्यांचे अनेक नातेवाईक आले होते. सोमवारी (१४ एप्रिल) यातील महिला व बालक नदीत आंघोळ आणि कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी ५ वर्षीय बालक अचानक नदीत पाय घसरुन पडला. मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई, मावशी दोघींनी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्या दोघींनाही पोहता येत नसल्याने तिघेही पाण्यात बुडाले. याबाबत माहिती समजताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नागरिक पोहोचेपर्यंत हे बुडून मयत झाले होते.
वैशाली सतीश भिल (वय २८), त्यांचा मुलगा नकुल सतीश भिल (वय ५, रा. अंतुर्ली ता. अमळनेर) आणि सपना गोपाल सोनवणे (वय २७, रा. पळाशी, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती यावल पोलिसांना देण्यात आली. तिघांचे मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.