जळगावात दरोडा टाकून वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन लुटले

जळगाव : जळगाव शहरातील खेडी येथे चोरट्याने पहाटे दोन ठिकाणी दरोडा टाकल्याचे उघडकीस आले आहे. दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या १२ वर्षाच्या नातवाला मारहाण करुन त्यांच्याकडील ४० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटून नेले. जखमी वृद्ध दाम्पत्य व त्यांच्या नातवाला रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा प्रकार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.

दुसर्‍या ठिकाणी दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला. लोकांनी दरवाजा न उघडल्याने दरोडेखोर शेवटी निघून गेले. पोलीस घटनास्थळी पोहचले असून महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे.

शहरातील दौलतनगर भागात ३ फेब्रुवारी रोजी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता़ त्यावेळी त्यांनी २२ लाखांचा ऐवज लुटून नेला होता. या गुन्ह्याचा तपास अद्याप लागला नसताना आज पुन्हा दोन ठिकाणी दरोडा टाकण्यात आला आहे.