जळगाव : पत्नीचा गळा दाबून खून करणार्‍या डॉक्टर पतीला जन्मठेप, सासर्‍याला 4 वर्ष कैद

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  जळगाव न्यायालयात सरकारी वकील असलेल्या रेखा उर्फ विद्या राजपूत यांची उशीने तोंड, गळा दाबून हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला जन्मठेप, तर सासर्‍याला 4 वर्षाची कैदेची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी गुरुवारी (दि. 12) हा निकाल दिला. नातेवाईकांनी दिलेल्या साक्षी, मोबाईल सीडीआर व फाॅरेन्सिक अहवाल यात महत्त्वाचा ठरला आहे. या खटल्यात 19 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यापैकी 14 साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

डॉ. भरत लालसिंग पाटील, लालसिंग श्रीपत पाटील (74, रा. बेलखेडे, ता. भुसावळ) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. जळगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सरकारी वकील असलेल्या रेखा उर्फ विद्या राजपूत यांचा 13 जानेवारी रोजी उशीने तोंड आणि गळा दाबून खून झाला होता. पती डॉ. भरत लालसिंग पाटील आणि सासरे लालसिंग पाटील या दोघांना गुन्ह्यात अटक झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पती कारागृहात होता तर सासरा लालसिंग पाटील हा जामिनावर होता. निकालानंतर न्यायालयाने दोघांना अटक केली आहे. निकाल देताना न्यायालयाने संशयानम: विनाशाय संस्कृतमधील म्हणीचा आश्रय घेऊन संशय आला कि विनाश होतो असे पती डॉ.भरत याला सुनावले. विद्या राजपूत यांच्या चारित्र्यावर पतीकडून सतत संशय घेतला जात होता. त्या सतत मोबाइलवर बोलत असत त्यामुळे त्यांच्यावर अधिक संशय घेतला जात असल्याचे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी न्यायालयात सांगितले.