जळगावात खडसे – महाजन समर्थकांमध्ये ‘राडा’, किरकोळ वादातून काढले पिस्तुल

जळगाव : जळगाव शहरालगत असलेल्या एका ढाब्यावर भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि जळगावचे माजी नगरसेवक सुनिल माळी यांचे बंधु मुकेश माळी या दोघांच्या गटात किरकोळ वादातून चांगलाच राडा झाला. यावेळी अनिल चौधरी यांच्या एका समर्थकाने पिस्तुल काढल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिल चौधरी हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जवळचे मानले जातात. तर सुनिल माळी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

शहरा लगत असलेल्या खेडी शिवारातील महेंद्र ढाबा या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांच्या समर्थकाने ढाब्यावर एकाला रिव्हॉल्वर लावत धिंगाणा घातला. भाजपचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे बंधु मुकेश माळी यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला. दोन्ही गट किरकोळ कारणावरुन समोरासमोर आले होते. त्यातून वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर दोन्ही गटाने आपसांत समझोता घडवून आणण्यात आला. हा वाद मिटल्यानंतर मंगळवारी या भांडणाचा व पिस्तुल काढण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्याची दखल घेऊन एमआयडीसी पोलिसांनी अनिल चौधरी, नगरसेवक भगत बालाणी यांच्यासह दोन्ही बाजूच्या एकूण १० जणांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.