…म्हणून महाराष्ट्रातील ‘या’ गावात होणार पुन्हा मतदान

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – मॉकपोलची मतं डिलीट न केल्यामुळे जळगाव लोकसभा मतदार संघाच्या भडगावमध्ये पुन्हा फेरमतदान घेण्यात येणार आहे. २३ एप्रिलला या केंद्रात मतदान पार पडलं. पण आता या कारवाईनंतर पुन्हा २९ एप्रिलला मतदान होणार आहे. मॉकपोलमुळे फेरमतदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी हे आदेश काढले आहेत. यासंदर्भात अधिकृत माहिती देत पत्रकही जारी करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव लोकसभा मतदार संघाच्या भडगावमध्ये १०७ नंबरच्या बूथवर लोकसभा निवडणुकीत मॉकपोलची (अभिरुप मतदान) ५० मते डिलीट करण्यात आली नाहीत तसेच ३ मते अतिरिक्त आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या मतदार संघात पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. या चुकीमुळे केंद्र अध्यक्षासह २ जणांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव बाबूराव पाटील ( सहायक शिक्षक, योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बु.ता.अमळनेर) आणि मतदान अधिकारी क्र. ३ सुनीता नारायण देवरे (शिक्षिका, लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव) यांचा समावेश आहे.

जळगाव लोकसभा मतदार संघाच्या भडगावमध्ये १०७ नंबरच्या बूथवर २९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.