जळगाव : अल्पवयीन मुलीवर झाला होता बलात्कार, हत्याकांडाला धक्कादायक वळण !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एका शेतातील रखवालदाराच्या चार मुलांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरुन गेला आहे. ही घटना रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे आज सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. आता या हत्याकांडाला वेगळे वळण लागले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पोलिसांच्या हवाल्याने धक्कादायक खुलासा केला आहे. एकनाथ खडसे यांनी सांगितले की, हत्येतील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. दरम्यान रावेर पोलीस मेडिकल रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.

रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील मुस्तफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या मेहताब आणि रुमलीबाई भिलाल हे दाम्पत्य आपल्या मुळगावी मध्य प्रदेशातील खरगोल जिल्ह्यातील गढी येथे चुलत भावाच्या नातवाच्या दशक्रियाविधीसाठी गेले आहेत. घरात त्यांची चारही मुले एकटी होती. त्यातील पिडीत मुलगी (वय-14), राहुल (वय-11), अनिल (वय-8) आणि राणी (वय-5) ही भावंडे एकटीच रहात होती. पीडित मुलगी ही सर्वांची देखभाल करत होती. शेता शेजारीच हे कुटुंब घर बांधून राहत होते.

आज सकाळी शेत मालक मुस्तफा हे शेतावर गेले असता घराजवळ कुणीच दिसलं नाही. त्यांनी मुलांना आवाज दिला, पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी घरात डोकावून पाहिले असता चौघांचे मृतदेह आढळून आले. चौघांचे मृतदेह पाहून मुस्तफा यांना मोठा धक्का बसला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चौघांही चिमुरड्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. चौघांचा कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे.

एसआयटीची स्थापना
रावेर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र इंगळे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार चिंथा, जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे घटनास्थळी दाखल होवून तब्बल सात तास घटनास्थळी पोलिसांचा तपास सुरु होता. या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पाच विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याच माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

आरोपींना 24 तासात अटक करा
घटनास्थळी मृतांचे आई-वडील हे मुलांना अशा अवस्थेत पाहून बेशुद्ध पडले. पोटच्या चार गोळ्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आई-वडीलांचे व परिवाराचे दु:ख अनावर झाले होते. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी या घटनेचा निषेध केला असून घटनेतील दोषींना 24 तासात अटक करा अशी मागणी नातेवाईकांनी राज्य सरकारकडे केली आहे.

इन कॅमेरा शवविच्छेदन
या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेतील चारही मृतकांची इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेची माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी निंदा केली असून जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अतिशय गंभीर असून त्याकडे पोलिसांनी आता अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.