Jalgaon News : जबरी चोरीच्या गुन्ह्यात झाली होती अटक, जामिनावर बाहेर आला आणि त्यानंतर खून झाला

जळगाव ( jalgaon ) : पोलिसनामा ऑनलाइन – टपरी चालकावर चाकू हल्ला केल्याच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीचा शाहू नगरातील जळके मीलच्या आवारात खून झाल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता उघडकीस आली. शेख अल्तमस शेख शकील उर्फ सत्या (१९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, खुनाचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नसले तरी संशयावरुन एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी सत्या याने शाहू नगरात मुजाहील शेख इब्राहीम (२१) या टपरीचालकावर चाकू हल्ला केला होता. बंद केलेली टपरी परत उघडून सिगारेट देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाला होता. यात सत्या याला अटक झाली होती. न्यायालयाने त्याचा नुकताच जामीन केला. रविवारी रात्री शाहू नगरातील जळके मीलच्या पडक्या खोल्यांमध्ये सत्या मृतावस्थेत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने त्याचा चुलत भाऊ ऐहतेश्याम मुश्ताक शेख याला दिली. त्याने तातडीने सत्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. तीन दिवसापूर्वीच काही जणांनी घरी येऊन सत्याला धमकी दिली होती, त्यामुळे त्या तिघांनीच त्याला मारले असावे, असा संशय ऐहतेश्याम मुश्ताक शेख याने पोलिसांना माहिती देतांना व्यक्त केला. या संशयावरुन पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.