विधान परिषदेसाठी 12 नावे ठरली, पण… : गृहमंत्री देशमुख

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा नावे ठरली (12-persone-nominated-as-maharashtra-mlc) आहेत. मात्र, ही नावे गुपित आहेत ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच माहिती आहेत. योग्यवेळी ती नावे आम्ही जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister, Anil Deshmukh) यांनी रविवारी दिली.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी देशमुख अमळनेर आले होते. या कार्यक्रमाआधी पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, माजीमंत्री डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल पाटील, चिमणराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ आदी उपस्थित होते.
गृहमंत्री देशमुख म्हणाले, विधान परिषदेवर बारा जणांची नियुक्ती केली जाणार आहे. ती नावे तीनही पक्षांकडून सर्वानुमते ठरली आहेत. या नावांच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी घेतली असून, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने तसे पत्र लवकरच राज्यपालांना देण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांनी या नावांना तत्काळ मंजुरी देणे अपेक्षित असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

खडसेंमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढणार
माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे. खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये मोठा गदारोळ उडाला आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार आहे, अशी आवई उठवली जात आहे. आपल्या पक्षाची पडझड रोखण्यासाठी त्यांची धडपड सुरु असल्याची टीकाही देशमुख यांनी यावेळी केली.