भुसावळमध्ये 34 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून, प्रचंड खळबळ

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन –  एका 34 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना भुसावळ (जि. जळगाव) शहरातून समोर आली आहे. मंगळवारी (दि. 13) भरदुपारी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संदीप गायकवाड (वय 34 रा. भुसावळ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील चाळीस खोली भागांमध्ये मोकळ्या मैदानात 30 ते 35 वर्षाचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, 34 वर्षे तरुणाच्या डोक्यात दगड घालून किंवा तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे खून झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अर्चित चांडक घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड घटनास्थळी तपास करत आहेत. या प्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मृत संदीपच्या मागे आई, पत्नी आणि चिमुकली मुलगी आहे.