Jalgaon News : उपमुख्याधिकारी जैन समाजाच्या वादात पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

जळगाव : अमळनेर शहरात लावलेले फलक काढून टाकल्याने अमळनेर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी व जैन समाजाकडून एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. दोघांच्या वादात गुन्हे दाखल केलेले अमळनेरचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांची पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षाचे निरीक्षक दिलीप भागवत यांची नियुक्ती केली आहे.

अमळनेर येथील युवक विनय बागरेचा हा जैन दीक्षा घेत आहे. त्याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते. गेल्या मंगळवारी रात्री उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी ते फलक काढून टाकले. तसेच यावेळी आलेल्या जैन समाजातील लोकांना शिवीगाळ केली. समाजाच्या भावना दुखावल्याने गायकवाड यांच्याविरोधा युवकांनी तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गायकवाड यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, गायकवाड यांची तक्रार सुरुवातीला घेतली नव्हती. तेव्हा त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात सोशल मिडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर जैन युवकांनी धमक्या दिल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. युवकांवर गुन्हा दाखल झाल्याने जैन समाजामधून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येऊन गायकवाड यांच्यावर कारवाई मागणी केली गेली. तसेच गुन्हे मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्याचवेळी तक्रार दिल्यानंतर उपमुख्याधिकारी गायकवाड हे बेपत्ता झाले आहेत. हे सर्व प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून मुंढे यांनी मोरे यांची बदली केली आहे.