नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अमळनेर तालुक्यातील वाघोदे शिवारामध्ये नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भावेश बळीराम देसले (वय १५), हितेश सुनील पवार (वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत.

शनिवारी लोंढवे येथील भावेश देसले, हितेश पवार आणि जयवंत पाटील हे तिघे जवळच असलेल्या तुडूंब भरुन वाहणाऱ्या नाल्यात पोहण्यासाठी गेलेले. तिघेही स्व. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकणारे विद्यार्थी होते. भावेश आणि हितेश हे दोघे जण १५ फूट खोल पाण्यात गेले आणि काही वेळातच बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचं पाहून जयवंत घाबरला. त्यावेळी मदत करण्यासाठी त्याने आरडाओरडा केला. पण जवळ कोणीच नसल्याने वाचवण्यासाठी कुणी आले नाही. त्यानंतर जयवंत गावात धावत गेला दोघे मित्र नाल्यात बुडाल्याची माहिती दिली.

तातडीने भावेश, हितेश यांच्या कुटुंबीयांसह सरपंच कैलास खैरनार, शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, खूप उशीर झालेला होता. त्यानंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तेव्हा दोघांच्या कुटूंबियांनी प्रचंड आक्रोश केला.

दोरीने केला घात…

भावेशला पोहायला येत असल्याने तो हितेशला दोर बांधून पोहायला शिकवत होता. तर जयवंत हा काठावर बसला होता. पोहताना अचानक हितेशला बांधलेला दोर तुटला. त्यावेळी भावेशने त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण यश आले नाही. हितेश जास्त खोल पाण्यात गेल्याने त्याचा दम गुदमरल्याने तो बुडाला. पोहता येत असून सुद्धा भावेशही पाण्यात बुडाला आणि दोन मित्रांचा करुन अंत झाला. भावेश आणि हितेशचे वडील शेतकरी असून त्यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. भावेश हा एकुलता एक होता. तर हितेश ला तीन भाऊ असून, घरात तो मोठा होता. दरम्यान, या घटनेनंतर गावात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.