भररस्त्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे प्राण वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचविण्यात यश आले आहे. जळगाव शहरात शुक्रवारी रात्री मुख्य बस स्थानकासमोर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ हा प्रकार घडला.

कैलास नारायण भांगे ( वय 40 , रा -यवतमाळ ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. कैलास भांगे हा तरुण अत्यंत विमनस्क अवस्थेत बराच वेळ बसस्थानकासमोरील रोहित्राजवळ उभा होता. त्याचा इरादा आत्महत्या करण्याचा होता. त्याचवेळी येथील चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांंनी त्या हटकले, त्याचा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

वीज पुरवठा सुरू असल्याने या इसमाला पोलिसांनी मागून येत रोहित्रापासून दूर ढकलून देत त्याचा रोहित्रातील हात काढला आणि मोठा अनर्थ होता होता टळला. त्याला त्यानंतर वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले आणि जिल्हा पेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. कैलास भांगे याच्यावर प्रतिबांधात्मक कारवाई करण्यात आली आहे.