काय सांगता ! होय, 10 वी चा पहिलाच पेपर फुटला अन् परीक्षेपुर्वीच WhatsApp वर झाला ‘व्हायरल’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरु झाली आहे. मात्र जळगावात मराठी विषयाचा पहिलाच पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे पेपर सुरु होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉटसऍप वर व्हायरल झाली होती. या घटनेमुळे मात्र संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

व्हॉटसऍप वर व्हायरल झाली प्रश्नपत्रिका

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हाकाकोडा येथील शिवाजी हायस्कुलमध्ये हा प्रकार घडला आहे. मराठीचा पेपर सुरु होण्यापूर्वीच त्याची प्रश्नपत्रिका व्हॉटसऍप वर व्हायरल झाली. विशेष म्हणजे काही तरुणांनी शिक्षकांच्या मदतीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परीक्षेच्या केंद्राबाहेर एक तरुण व्हॉटसऍप वर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे परीक्षा केंद्राबाहेर शोधात असताना हा प्रकार उजेडात आला.

शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाचा गवगवा करण्यात येत असताना हा प्रकार घडल्याने परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित केंद्र संचालक तसेच पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.