1.25 लाखाची लाच घेताना महिला प्रांताधिकाऱ्यासह लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – वाळू वाहतूकदारांकडून सव्वा लाख रुपयाची लाच घेताना जळगाव येथील प्रांताधिकारी व लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) अटक केली आहे. या दोघांनी वाळू वाहतूकदारांकडे ट्रक सोडण्यासाठी दोन लाखाची मागणी केली होती. दिपामाला चौरे असे प्रांताधिकारी यांचे नाव आहे. तर अतुल सानप असे लिपिकाचे नाव आहे.

जळगावात वाळू वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराकडे गौण खनिजकर्म अधिकारी बुलढाणा यांचा वाळू वाहतुकीचा परवाना होता. मात्र, या वाहतूकदाराचे वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक जळगावच्या तहसील पथकाने पकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात उभे केले होते. हे ट्रक सोडण्यासाठी दीपमाला चौरे यांनी लिपिक अतुल सानप याच्या मार्फत दोन लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीमध्ये सव्वा लाख रुपये देण्याचे ठरले होते.

या संदर्भात वाळू वाहतूकदाराने लाचलुपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता दीपमाला चौरे यांनी लिपीक सानप याच्यामार्फत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी सापळा रचून अतुल सानप यांच्या खासगी पंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. त्याने प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि लिपिक अतुल सानप यांच्यासाठी रक्कम स्वीकारत असल्याचे सांगितल्या नंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजोग बच्छाव, हवालदार अशोक आहिरे, मोनोज जोशी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.