Jalgaon News : 240 रुपयाची लाच घेताना तलाठी व कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी 240 रुपयाची लाच घेताना तलाठी आणि तलाठी कार्यालयातील एकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे तलाठी कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी 38 वर्षीय शेतकऱ्याने तक्रार केली.

तलाठी प्रविण श्रीकृष्ण मेश्राम (वय-41 रा. सपना नगर, प्रभाकर हॉल जवळ, भुसावळ), कोतवाल प्रकाश दामू आहीर (वय-45 रा. अंबिका नगर, कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ) अशी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांनी त्यांच्या शेतावर गावातील वाजी विकास सोसायटीचे कर्ज घेतले होते. या कर्जाची त्यांनी परफेड केली आहे. कर्जासाठी उताऱ्यावर बोजा चढवण्यात आला आहे. हा बोजा कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी तलाठी मेश्राम आणि कोतवाल आहीर यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी 240 रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पचासमक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज तलाठी कार्यालयात सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उप अधीक्षक गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, सहाय्यक फौजदार रविंद्र माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहीरे, सुनिल पाटील, सुरेश पाटील, पोलीस नाईक मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.