Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पोलीसनामा ऑनलाईन टीम : केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून महत्वाकांक्षी जलजीवन मिशन सुरु करण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देणे ही त्यामागची भूमिका आहे. त्यासाठी १३ हजार ६६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहणाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दरडोई किमान ५५ लिटर पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट असून या कार्यक्रमासाठी सुमारे १३ हजार ६६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. नळ पाणीपुरवठा नसलेल्या राज्यातील ३ हजार ६०० गावांकरीता नवीन योजना प्रस्तावित आहे. राज्यातील ग्रामीण जनतेला घरगुती वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत व शुध्द पेयजल उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या सहभागातून महत्वाकांक्षी जलजीवन मिशन सुरु करण्यात आले आहे.

राज्यात जानेवारी २०२१ पर्यत ८३ लाख ७५ हजार घरगुती नळजोडणी झाली आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेतंर्गत ३ लाख ३९ हजार ४७२ कुटूंबांना शौचालय उपलब्ध झाले आहे. राज्यातील ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून पाणी गुणवत्ता सर्वेक्षणासाठी प्रत्येक गावातील पाच महिलांचा सहभाग असणार आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंमलात आणली. या योजनेतून जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार ३७ शेतकऱ्यांना ८९६ कोटी ३४ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. तर कर्जमुक्ती मिळालेल्या २ लाख २६ हजार ९४४ शेतकऱ्यांना १५१८.६३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरीत करण्यात आले. शेतकरी हा राज्याच्या विकासाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शासन कटिबध्द आहे, असं पाटील म्हणाले.