जळगाव : ऑक्सिजन अभावी पाचोर्‍यात दोघांचा मृत्यु?

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ऑक्सिजन अभावी एका तरुणासह दोघांचा मृत्यु झाला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

महेश तानाजी राठोड (वय ३२, रा. कुर्‍हाड, ता. पाचोरा) आणि जारसीबाई चव्हाण (वय ७५, रा. सोयगाव) अशी मृतांची नावे आहेत.

पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडरचा साठा संपत आला होता. त्यामुळे सायंकाळपासूनही प्रशासनाची धावपळ सुरु झाली होती. ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. ऑक्सिजन संपत असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली होती. मात्र, रविवारी दुपारी पाचोरा रुग्णालयात सिलेंडर पोहचणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, तोपर्यंत ऑक्सिजन संपून जाणार होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनचा पुरसे साठा नसल्याने दोघांचा मृत्यु झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी खासगी हॉस्पिटलमधून ३ सिलेंडर उपलब्ध करुन दिले. सध्यातरी मोठा अनर्थ टाळला आहे.