गस्तीवरील पोलिसांवर दुचाकीस्वारांनी ठासणीच्या बंदुकीतून 2 फैरी झाडल्या, प्रचंड खळबळ

रावेर : पोलीसनामा ऑनलाइन – रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी दुचाकीवरील चौघांना चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीवरील तरुणांनी ठासणीच्या बंदुकीतून पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून घटनास्थळावरुन पळ काढला. ही घटना पाल-रावेर रस्त्यावर सहस्त्रलिंग गावालगत असलेल्या एका ढाब्याजवळ मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातपुड्याच्या अतिदुर्गम डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या रावेर-पाल रस्त्यावर रावेर पोलीस ठाण्याच्या कॅमेरा वाहनातून पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम कांगणे, गृहरक्षक तालुका समादेशक कांतीलाल तायडे, सुनील तडवी, अमित समर्थ हे गस्त घालत होते. त्यावेळी मध्यप्रदेश सीमेवरील शेरीनाका येथे आंतरराज्यीय नाकाबंदीला भेट देण्यासाठी गेले होते. भेट देऊन परत येत असताना सहस्त्रलिंग गावालगतच्या वळण रस्त्यावर असलेल्या ढाब्यावर चहा मिळतो का ते पाहण्यासाठी थांबले होते.

पोलीस कॉन्स्टेबल कांगणे व त्यांचे सहकारी गाडीतून उतरून चौकशी करत होते. त्यावेळी पालकडून दोन मोटारसायकल वर चार जण येत असल्याचे दिसले. रात्रीची संचारबंदी असताना दुचाकीवरून जाणाऱ्या चौघांना त्यांनी हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकधारी दुचाकीस्वारांनी पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्या. अचानक फायरिंग झाल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

पोलिसांना जिवे मारण्याचा उद्देशाने दुचाकीवरील युवकांनी ठासणीच्या बंदुकीतून फायरिंग केले. संशयित आरोपींनी हल्ला केल्यानंतर युटर्न घेऊन पालच्या दिशेने पलायन केले, तर दुसऱ्या दुचाकीवरील आरोपींनी सहस्त्रलिंग दिशेने पोबारा केला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला मात्र, त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले. आरोपी हे वीस ते पंचवीस वयोगटातील तरुण होते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आरोपी शिकारीसाठी जात असावेत
आरोपी ठासणीचू बंदूक घेऊन शिकारीसाठी जात असावेत. त्यांना पोलीस वाहन व रस्त्यावर खाकी वस्त्र परिधान केलेले चार जवान उभे दिसल्याने त्यांना ते वनविभागाचे कर्मचारी असल्याचा संशय आला असावा. त्यामुळे त्यांनी जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन बंदुकीतून दोन फैरी झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

बंदुक सोडून पळाले

पोलिसांवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. मात्र, पळून जाण्याच्या धवपळीत त्यांच्या हातातील ठासणीची बंदूक ते घटनास्थळीच सोडून पळून गेले. बंदुकीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पाल आउटपोस्ट चौकीतून मेसेज मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रभारी पोलीस निरीक्षक शबीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलीस कॉनस्टेबल श्रीराम कांगणे यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर 307,353,337 आर्म अ‍ॅक्ट 3(25) व 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.