जळगाव : धक्कादायक ! पत्नीच्या आजाराचा खर्च न पेलविल्याने पती, मुलाची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – दवाखान्यात दाखल असलेल्या पत्नीच्या उपचारावर दीड लाख रुपये खर्च झाले, अजून ५ लाख रुपये खर्च होण्याची अपेक्षा असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने नैराश्यात गेलेल्या पती आणि मुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दीपक रतीलाल सोनार (वय ६५) आणि मुलगा परेश (वय ३४) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. शहरातील आदर्शनगर परिसरात गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. दीपक सोनार हे आपली पत्नी श्रद्धा आणि मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगर येथे राहतात. त्यांची पत्नी सराफ बाजारात दागिने पॉलिश करण्याचे काम करतात. दीपक हे सध्या घरीच आहेत. त्यांचा मुलगा मतीमंद होता. मुलगी रुपाली हिचा विवाह झाला असून ती नंदुरबारला असते.

त्यांची पत्नी श्रद्धा यांना निमोनिया व इतर आजार असलयाने त्यांना उपचारासाठी सोमवारी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च झाले आहेत. तरी प्रकृतीत सुधारणा होत नाही. हा खर्च त्यांचा जावई रुपेश सोनार यांनी केला आहे. त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांचा निमोनिया गंभीर स्वरुपाचा असल्याने प्रकृती चिंताजनक आहे. अजून ५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने दीपक सोनार नैराश्येत आले होते.

गुुरुवारी रात्री मुलगी व जावई रुग्णालयात असताना दीपक सोनार यांना फोन करत होते. पण ते फोन उचलत नसल्याने जावई रुपेश घरी आले. तेव्हा त्यांना सासरे आणि मेव्हणा दोघेही मृतावस्थेत आढळून आले.