Jalna Accident News | लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या वृद्ध पती-पत्नींचा अपघातात मृत्यू; मुलीची भेट राहिली अपूर्ण

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – Jalna Accident News | जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील दत्तू वामन बोराडे (वय 65) व कमलबाई बोराडे (वय 59 ) हे वृध्द दाम्पत्य आपल्या मुलीला भेटायला जात होते. यादरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यांचा वाटेतच रस्ते अपघातात मृत्यू झाला. जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोदबाजार (ता. सिल्लोड) पोलीस ठाण्याच्या समोर खामगावकडे वळण घेत असताना क्रुझरने दुचाकीला दिलेल्या धडकेत या वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. (Jalna Accident News)

 

काय घडले नेमके?

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथील बोराडे दाम्पत्य काल सकाळी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. लेकीने खूपच आग्रह केला होता. तिच्या मुलाबाळांना खेळवू, तिच्या घरच्यांशी गप्पा मारू, मुलीला भेटण्याच्या ओढीने हे दाम्पत्य गावातून मोठ्या आनंदाने निघाले होते. मात्र नियतीने घात केला आणि या वृद्ध दाम्पत्याचा मुलीच्या घरी पोहोचण्यागोदरच अर्ध्या वाटेतच रस्ते अपघातात मृत्यू झाला. (Jalna Accident News)

 

हे दाम्पत्य फुलंब्री सिल्लोड रोडवरील खामगाव फाट्यापर्यंत आले आणि त्याच वेळेस पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच 19, एपी 2988 या क्रुझर जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि हे दाम्पत्य धडकेमुळे दूरवर फेकले गेले आणि मोठ्या प्रमाणात जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच वडोदबाजार पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास मोरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर याप्रकरणी वडोदबाजार ठाण्यात क्रुझर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या वृद्ध दाम्पत्याच्या माघारी पाच मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दगडवाडी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :  Jalna Accident News | husband and wife died after over speed jeep hit bike in jalna

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा