दुर्दैवी ! परीक्षेला जाताना दुचाकीचा भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – पाठीमागून भरधाव येणा-या दुचाकीने परीक्षेला निघालेल्या दुचाकीस्वार तरुणांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अंबड-जालना महामार्गावर रिलायन्स व महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (दि. 1) दुपारी हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अभिषेक दादासाहेब टकले (वय 20) व अमर सतीश टकले (21, दोघेही रा. रोहिलागड ता. अंबड) असे अपघात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक टकले आणि अमर सतीश टकले हे दोघे एका दुचाकीवरून अंबड शहरात परीक्षा देण्यासाठी जात होते. त्यावेळी पाठीमागून येणा-या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने दोघेही खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.