चोरट्यांनी जालना जिल्हा बँकेतून लाखोंच्या रोकडसह तिजोरीही पळवली

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – चोरट्यांनी जालना जिल्हा बँकेतून लाखोंच्या रक्केसह बँकेतील तिजोरीही पळवून नेल्याची घटना घडली आहे. जालना जिल्हा बँकेच्या पानेवाडी शाखेत ही घटना घडली असून या घटनेत सव्वासात लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली आहे. शेतकऱ्यांच्या पीएम किसान अनुदान वाटपापूर्वीच चोरट्यांनी पैशांवर डल्ला मारला आहे. एवढेच नाही तर चोरट्यांनी बँकेत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआरही पळवून नेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घनसांगवी तालुक्यातील पानेवाडी गावातील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे चॅनल गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी बँकेचे लोखंडी तिजोरी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर चोरून नेला. चोरट्यांनी चोरून नेलेल्या तिजोरीत 7 लाख 28 हजार 168 रुपये होते. रोख रक्कम, 12 हजारांची लोखंडी तिजोरी आणि 10 हजाराचा डिव्हीआर असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

चोरट्यांनी लंपास केलेली रोकड पीएम किसान सन्मान योजनेची होती. शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी ही रक्कम आणण्यात आली होती. शेतकऱ्यांना ही रक्कम वाटप करण्यापुर्वीच यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक रघुनाथ यांच्या फिर्यादीवरून घनसांगवी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.