जुन्या वादातून जालन्यात दोन भावंडांचा जमावाकडून निर्घृण खून

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – पोळ्या दिवशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जमावाने दोन भावंडांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा गावात घडली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे. राहुल बोर्डे आणि प्रदीप बोर्डे असे खून झालेल्या भावंडांची नावे आहेत. सध्या गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.

जालना शहरापासून जवळच असलेल्या पानशेंद्रा गावात पोळ्याच्या दिवशी राहुल गौतम बोर्डे याचे गावातील काही जणांसोबत वाद होते. याच वादातून त्यांच्यात हाणामारी झाली होती. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आले होते. आज सकाळी राहुल बर्डे (वय-25) आणि त्याचा भाऊ प्रदीप बर्डे (वय-23) या दोघा भावांना 10 ते 15 जणांच्या जमावाने गाठले. त्यांच्यावर काठ्या, कुऱ्हाडी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये राहुल याचा जागीच मृत्यू झाला तर प्रदीप गंभीर जखमी झाला. त्याला ताततडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून गावामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे पोलिसांच्या फौजफाट्यासह गावात पोहचले.पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन 15 जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजतय. जमावाने केलेल्या हल्ल्यामध्ये आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटून हा व्यक्ती पळून गेला. सध्या तो बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, गावात सध्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावाचे वातावरण आहे.