राज्य EC चा मोठा निर्णय ! 33 जिल्ह्यातील पालिकांवर होणार परिणाम

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीवर आक्षेप व हरकती मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. यामुळे या बाबी निकाली काढण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने या मतदार यादीचा कार्यक्रमाला मुदतवाढ दिली आहे. यामुळे हरकती व आक्षेप निकाली निघणार असून वस्तुनिष्ठ मतदार यादी तयार होण्यास मदत होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी काढलेल्या पत्रकानुसार, राज्यातील मुंबई शहर, उपनगर तसेच पालघर व सातारा जिल्हा वगळून सर्व जिल्ह्यातील पालिकांचा समावेश आहे. एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या आणि मुदत संपलेल्या तसेच फेब्रुवारी 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता हद्दवाढ क्षेत्रांच्या व रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीकरीता मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमात बदल
नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रारुप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती व आक्षेप आले आहेत. त्यातच सध्या राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने सूचना व हरकतींवर भेटीद्वारे वस्तुनिष्ठ निर्णय घेण्याकरता जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काही नगरपरिषद व नगरपंचायत यांनी निवडणूक आयोगाला कळवले आहे. तसेच मतदार यादी अधिप्रमाणीत करुन प्रसिद्ध करण्याची तारीख वाढवून मिळावी यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने 2 फेब्रुवारी 2021 रोजी निर्गमित केलेल्या मतदार यादी कार्यक्रमात बदल केला आहे.

हरकती वाढल्याने मुदतवाढ
मतदार यादीवर हरकती घेण्याची मुदत 22 फेब्रुवारी पर्यंत होती. मात्र, या कालावधीत अनेक हरकती आल्याने त्यावर योग्य कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्याला मतदाराच्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करणे बंधनकारक झाले होते. मात्र, मतदार यादी निश्चित करण्यासाठी जो कालावधी दिला होता तो अपुरा पडत असल्याने आणि हरकतींचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून मुदवाढ देण्यात आली आहे. जी मतदार यादी 1 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध होणार होती ती आता 15 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध होईल. तर प्रभागातील बूथनिहाय मतदार यादी 8 मार्च 2021 ला प्रसिद्ध होणार होती. यामध्ये बदल करुन 31 मार्च 2021 ही तारीख देण्यात आली आहे. असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी कळवले आहे