‘मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’

अंबड : पोलीसनामा ऑनलाइन – सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी (दि. 31) अंबड शहरातून (जि. जालना) वाहन रॅली काढण्यात आली होती. यावेळी समाज बांधवांनी आरक्षण आमच्या हक्कांचे नाही कुणाच्या बापाचे, मराठा समाजाला आरक्षण मिळत कसे नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेला भगवा झेंडा लावून कुटूंबातील सदस्यांसोबत समाजबांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.

अंबड शहरातील जालना-बीड महामार्गावरील पाचोड नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून शहरासह तालुक्यातील गाव, वाडी, वस्तीवरून सकल मराठा समाज बांधव आपली दुचाकी, चारचाकी वाहनासह रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी तहसिलदार विद्याचरण कडवकर यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. अंबड शहरातून वाहन रॅली साष्टपिंपळगावकडे हजारो वाहने मोठ्या स्थितीत रवाना झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.