‘कोणत्याही परिस्थितीत धनगर समाजाला आरक्षण मिळवूनच देणार, ही लढाई समाजाच्या ताकदीवरच जिंकणार’ – आ. गोपीचंद पडळकर

जाफराबाद (जालना) : पोलीसनामा ऑनलाईन – धनगर समाजासाठी आरक्षण हा महत्वाचा मुद्दा असून त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकार मध्ये चर्चा सुरु आहे. समाजाच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच आरक्षण मिळण्यासाठी सदैव पुढाकार घेणार आहे. समाजहितासाठी आरक्षण हा श्रेयवादाचा मुद्दा नसुन अस्तीत्वाची लढाई आहे, ती लढाई समाजाच्या ताकदीवर जिंकणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

जाफराबाद येथे आयोजित कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात आमदार पडळकर बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोंडु दिवटे होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, जि.प.सदस्य संतोष लोखंडे, गोविंदराव पंडीत, शिवदासजी बीडकर, दिपक बोराडे, प.स.सभापती दगडुबा गोरे, जगन पंडीत, साहेबराव कानडजे, भाजपा शहराध्यक्ष निवृत्ती दिवटे, कैला दिवटे आदी उस्थित होते.

आमदार पडळकर म्हणाले, मेंढपाळांना आपल्या मेंढाराची पालन पोषण करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी मेंढपाळाचा प्रश्न मार्गी लावण्या बरोबरच प्रमुख व्यवसाय नजरेसमोर ठेवून मेंढपाळासाठी 10 लाख कर्जाची तरतुद केली असल्याचे ते म्हणाले. धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आ.पडळकर हे सदैव प्रयत्नशील असुन त्यांचे समाजहिताचे काम पाहता सर्व धनगर समाज बांधव त्यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचे सुरेश दिवटे म्हणाले. सुत्रसंचालन विजय वैद्य यांनी केले.