जालना पोलीस मुख्यालयात पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जालना पोलीस मुख्यालयात एका सहाय्यक फौजदाराने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस मुख्यालयात एकच खळबळ उडाली आहे.

सुभाष गायकवाड यांनी आज (मंगळवार) सकाळी पावणे नऊच्या सुमारास पोलीस मुख्यालयात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सुभाष गायकवाड हे आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास स्कॉटिंग करुन पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते.

सुभाष गायकावड यांनी शस्त्रागार विभागाच्या पाठिमागे जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.