शनीच्या कड्या होणार नष्ट ?

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – तुम्हाला माहीत आहेच की, शनी ग्रहाभोवती असलेल्या कड्या हे त्याचे महत्त्वाचेच वैशिष्ट आहे. परंतु या कड्या हळूहळू नष्ट होताना दिसत आहेत. ‘व्होएजर-1’ आणि ‘व्होएजर-2’ या यानांच्या निरीक्षणावरून शनी ग्रह आपल्या कड्या वेगाने गमावत चालला असल्याचे समोर आले आहे. काही दशकांपूर्वी याबाबतचे निरीक्षण करण्यात आले होते. हाती आलेल्या नवीन माहितीनुसार, या कड्यांचे आयुष्य आणखी 10 कोटी वर्षेच असल्याचे खगोल शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

एखादा ऑलिम्पिकचा पूल भरण्याइतके या कड्यांमध्ये पाणी आहे. केवळ अर्ध्या तासातच या पाण्याने एखादा स्विमिंग पूल भरू शकतो! मात्र या कड्यांचे अस्तित्व आता अधिक काळ टिकणारे नाही अशी माहिती ‘नासा’च्या मेरिलँडमधील गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील जेम्स ओ डोनोगी यांनी दिल्याचे समोर आले आहे. शनी हा ग्रह तब्बल 4 अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेला आहे.  शनी ग्रहाच्या तुलनेत या कड्या अल्पायुष्यी असल्याचे समजत आहे.

हाती आलेल्या नव्या संशोधनानुसार, या कड्या नंतर निर्माण झाल्या असाव्यात असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कड्या पाण्याच्या सुक्ष्म बर्फाने बनलेल्या आहेत. त्या शनीकडे गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्या जातात. अशाच प्रकारच्या कड्या एकेकाळी गुरू, युरेनस किंवा नेपच्यूनलाही असाव्यात. त्यांचे आता केवळ धूसर अस्तित्वच राहिलेले आहे. असेही समजत आहे.