जामिया फायरिंग : ‘रामाचं नाव घेऊन सत्तेत आलेले लोक देश ‘नथुराम’चा बनवताहेत, उध्दवस्त होण्यापुर्वी जागे व्हा’, कन्हैया कुमारनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात आज (गुरुवार) नागरिकत्व सुधारणा कायद्याच्याविरोधात मोर्चा निघाला असताना विद्यार्थ्यांमध्ये घुसलेल्या एका तरुणाने देशी कट्ट्याने गोळीबार केला. यावरुन आता राजकारण तापले आहे. जेएनयूचा माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारने यावरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे.

कन्हैया कुमारने या घटनेवर ट्विट करताना लिहिले की पाहा हे फोटो. द्वेषाने स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी नथुराम गोडसेने 72 वर्षांपूर्वी गांधीजींची हत्त्या केली होती कारण त्याला वाटत होते की बापू देशाचे गद्दार आहेत. आज रामाचे नाव घेऊन सत्तेत आलेले लोक देश नथुरामचा बनवत आहेत. जागे व्हा, अन्याथ देश बर्बाद होईल.

गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी त्याला पकडले होते. ही घटना कॅमेरात कैद झाली. ज्यात दिसते आहे की कसे हा तरुण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये घूसुन नारे देतो की ही घ्या आझादी. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला.

या प्रकरणी डीसीपी चिन्मय बिस्वाल म्हणाले की पोलीस प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलिसांकडून कोणतीही चूक झालेली नाही. डीसीपी म्हणाले की त्यांना गर्दीला पुढे जाण्यापासून रोखायचे होते. सध्या पोलिसांकडून याचा तपास सुरु आहे की हा तरुण कोण आहे आणि कुठून आला होता? सीएए आणि एनआरसीच्या मुद्यांवर जामिया मिलिया इस्लामियाचे विद्यार्थी विरोध प्रदर्शन करत होते.

गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव शादाब फारुक असल्याचे डीसीपी चिन्मय बिस्वाल म्हणाले. ते पुढे म्हणाले की जखमी तरुणाच्या उजव्या हाताला जखम झाली आहे. त्याला ट्रॉमा सेंटरला दाखल केले गेले. डॉक्टरांनी सांगितले की त्याची तब्येत ठीक आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी सुरु आहे.