जामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून 70 संशयित आरोपींचे छायाचित्रे जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 70 संशयित आरोपींची छायाचित्र जाहीर केली आहेत. सीएए कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आला होता. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी काही जणांना तोडफोड, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पोलिसांकडून 70 संशयितांची छायाचित्र जाहीर करण्यात आली.

दिल्ली पोलिसांनी याची माहिती देताना सांगितले की, न्यू फ्रेंडस् कॉलनी पोलीस ठाण्याची गुन्हे शाखा आणि एसआयटीकडून हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात सहभागी 70 जणांची छायाचित्र पोलिसांनी सादर केली आहेत. या संशयित आरोपींची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या संशयित आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास 011-23013918 आणि 9750871252 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत जामिया विद्यापीठ परिसरात तीव्र आंदोलन झाले होते. परंतु या शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागले. काहींनी दगडफेक केली तर काहींनी बसेसला आग लावली असेही दिल्ली पोलिसांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी रात्रीच्या वेळी विद्यापीठात शिरकाव करुन विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. पोलिसांच्या या कारवाईचे पडसाद देशभरात उमटले. यानंतर देशातील विविध विद्यापीठात सीएए विरोधात आंदोलन करण्यात आली होती.

फेसबुक पेज लाईक करा