अहमदनगरमधील जामखेड बनतेय ‘हॉटस्पॉट’, मयत रूग्णाची दोन्ही मुलं ‘कोरोना’बाधित

अहमदमनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात जामखेड शहर हे कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी मृत्युमुखी झालेल्या एका रुग्णाची दोन्ही मुले कोरोना संसर्गित झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील दोन तरुणांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे बुधवारी कोरोना संसर्गित आढळलेल्या २ व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना कोरोनाचा संसर्गाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचदिवशी संगमनेर येथे ४ कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ५ ने वाढून ३७ वर गेली आहे.

जामखेड कोरोना हॉटस्पॉट केंद्र जाहीर…

जामखेड शहर यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २ किलोमीटचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. २२ एप्रिल रोजी जामखेड शहरात २ कोरोना संसर्गित आढळून आल्यामुळे या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात ६ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व दुकाने, अत्यावश्यक सेवा, आस्थापना ६ मे च्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपल्या आदेशात म्हटलं.

दरम्यान, नेपाळ मधून संगमनेर येथे आलेल्या १४ व्यक्तींपैकी ४ जणांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या आता ३७ वर गेली आहे.

४ एप्रिल रोजी या सर्व व्यक्तींना एका इमारतीमधून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. परंतु, १४ दिवसांनंतर यातील १० जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या सर्वांना संगमनेर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.