Coronavirus : जामखेडमध्ये साखळी तुटेना ! संपर्काची माहिती लपविल्याने ‘कोरोना’चे थैमान

पोलिसनामा ऑनलाईन – संपर्काची माहिती लपविली जात असल्यामुळे जामखेड शहरातील कोरोनाची साखळी तोडता आली नाही. आता गुन्ह्यच्या तपासाच्या धर्तीवर करोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा तपास घ्यायला सुरुवात केली आहे.

तबलिगी मरकजच्या कार्यक्रमानंतर 14 परदेशी नागरिक जामखेडला आले होते. शहरातील नुराणी कॉलनी, मोमीनपुरा व काझीगल्ली येथील तीन धार्मिक स्थळांमध्ये त्यांचे वास्तव्य होते. 11  दिवस हे परदेशी नागरिक जामखेड शहरात राहिले. त्यांना ताब्यात घेऊन आरोग्य तपासणी केली असता दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विदेशी नागरिकांसह आतापर्यंत 12 जणांना करोना झाला आहे.  नेवासे, संगमनेर व नगर शहरातील मुकुंदनगर भागातही विदेशी व परप्रांतीय नागरिकांचे वास्तव्य होते. त्यांच्यासह संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा झाली.

प्रशासनाच्या आवाहनानुसार शहरातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी पुढे येऊन आरोग्य तपासणी करुन घेतली. मात्र जामखेडला वारंवार आवाहन करुनही लोक पुढे आले नाहीत. त्यामुळे  साखळी तुटली नाही. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांना प्रशासनाने तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत 144 जणांची तपासणी करण्यात आली. अजूनही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याचे लोक दडवून ठेवत आहेत. त्यामुळे साखळी तुटू शकलेली नाही. जामखेड तालुक्यात पुणे व मुंबईसह विविध भागातून 11 हजारपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यांचीही तपासणी करुन त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले. मात्र सुमारे 10 हजार लोकांचे दररोजचे सर्वेक्षण हे आरोग्य विभागाला करावे लागत आहे.