पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच ; १ जवान शहीद

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यानंतर झालेल्या चकमकीत भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

पाकिस्तानी सैन्यानं शनिवारी जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यांनी शाहपूर आणि केरनी परिसराला लक्ष्य केलं, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.

या गोळीबारात जवान हरी वाकेर शहीद झाले. हरी वाकेर हे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. वाकेर यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला आहे. वाकेर हे मूळचे राजस्थानमधील रहिवासी होते.

जम्मू काश्मीरमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये दोन दिवसांपूर्वी रफियाबाद याठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सुरक्षा यंत्रणाची या परिसरात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी हानी झाली नव्हती. मात्र 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. मागील 4 दिवसांपासून या परिसरात सुरक्षा यंत्रणांची शोधमोहीम सुरु आहे. दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू आहे.