लष्करावर हल्ला, पुण्यातील मेजरसह २ जवान शहीद

नौशेरा (जम्मू-काश्मीर) : वृत्तसंस्था – नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट घडवला. या हल्ल्यात पुण्यातील एका मेजरसह दोन जवान शहीद झाले आहेत. मेजर शशी नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये संशयित दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळील पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एका मेजरसह दोन जवान गंभीर जखमी झाले. या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला. आयईईडी स्फोटांच्या मदतीने दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, असे एका लष्करातील अधिकाऱ्याने सांगितले.
शहीद झालेले मेजर शशीधरन नायर हे पुण्यातील रहिवासी होते. त्यांची पत्नी तृप्ती नायर या पुण्यातील खडकवासला येथे राहतात. मेजर शशीधरन हे ३३ वर्षांचे होते. ११ वर्षांपासून ते सैन्यात कार्यरत होते. मेजर नायर यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता विमानाने पुण्यात येणार असल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले.
याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्याला शोधण्यासाठी या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली व त्यानंतर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us