जम्मू काश्मीरमध्ये सरकारी कार्यालयात 50000 जागांसाठी भरती !

श्रीनगर : वृत्तसंस्था – भारत सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून काश्मीरमधील तरुणांसाठी आता मेगा नोकरभरती सुरू करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील घोषणा आज जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली असून स्थानिक तरुणांनी या भरतीचा फायदा करून घेण्याचे आवाहन केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी खात्यातील ५० हजार जागा रिक्त असून पुढील दोन ते तीन महिन्यात सर्व सरकारी रिक्त पदे या मेगाभतीद्वारे भरण्यात येणार आहेत. काश्मिरी जनतेने, विशेषतः तरुणांनी या सरकारी सेवेत दाखल व्हावे असे मलिक यांनी सांगितले.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यपाल मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली. काश्मीरच्या विकासासाठी सरकार सातत्याने विचार करत असून केंद्राच्या अनेक मंत्रालयाच्या बैठका यासंदर्भात सुरू आहेत. देशातील अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरचाही विकास वेगाने व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून आगामी सहा महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये अनेक महत्त्वाची कामे करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

काश्मीरबाबत अफवांवर विश्वास ठेऊ नये :
काश्मीरमधील परिस्थिती अस्थिर आहे, आंदोलने हिंसकपणे दडपली जातायेत याचबरोबर अनेक नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या अफवा काश्मीरबाबत पसरविण्यात येत आहेत. परंतु असे नसून राज्यात काही ठिकाणी आंदोलने झाली. पण त्यात एकाचाही मृत्यू झालेला नाही. हिंसात्मक आंदोलन करणाऱ्या काही लोकांना जास्त मार लागल्याने ते जखमी आहेत. परंतु राज्यातील सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.

म्हणून इंटरनेट सेवा खंडित :
काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर जनतेच्या भावना भडकावण्याचं काम सुरू होतं. इंटरनेटचा या कामी प्रभावी वापर होत होता. दहशतवादी फोन आणि इंटरनेटचा वापर करत होते. त्यामुळे काही काळ इंटरनेटची सेवा खंडित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र आता हळूहळू या सेवा पूर्वपदावर येतील असेही त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –